देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 653; अवघ्या 16 दिवसांमध्ये 18 कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची नोंद






नवी दिल्ली - देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण 27 राज्यांमध्ये पोहोचले आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 653 वर गेला आहे. अवघ्या 16 दिवसांमध्ये 18 पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. यात गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या राजधानीत 65 वर्षीय रुग्णाचा जीव गेला. तर मुंबईत 65 वर्षीय महिलेचे निधन झाले. यासोबत गुजरातच्या भावनगर मध्ये एका 70 वर्षीय कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तत्पूर्वी बुधवारी तामिळनाडूच्या मदुरै येथे 54 वर्षीय रुग्ण, मध्य प्रदेशात 65 वर्षीय रुग्ण आणि गुजरातमध्ये 85 वर्षीय रुग्ण अशा तीन जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यातील अहमदाबादची महिला नुकतीच परदेशातून परतली होती.


देशात अनेक ठिकाणी तपास करणाऱ्या डॉक्टरांशी गैरवर्तनाचे प्रकार समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने अशा लोकांवर सक्ती करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.


गोव्यात तीन रुग्ण सापडले


गोव्यात 3 लोक पॉझिटिव्ह सापडले आहेत. यातील 25 वर्षीय युवक स्पेन, 29 वर्षीय युवक ऑस्ट्रेलिया आणि 55 वर्षीय व्यक्ती अमेरिकेतून परतली होती. या सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे.


दिल्लीत 24 तास सुरू असतील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने


किराणा, दूध आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवर होणारी गर्दी पाहता दिल्ली सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सरकार पूर्ण आठवडाभर 24/7 सुरू ठेवणार आहोत असे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी सांगितले. दिल्ली सरकारने यासंदर्भातील निर्देश सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यासोबतच डॉक्टरांची काळजी घेताना सर्व डॉक्टरांच्या आणि रुग्णालय स्टाफच्या चाचण्या घेत राहणार असेही सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.


सोनिया गांधींचे पंतप्रधानांना पत्र लिहून लॉकडाउनला समर्थन


काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लॉकडाउन संदर्भात पत्र लिहून आपले समर्थन जाहीर केले. सोबतच, या लॉकडाउन आणि कर्फ्यू दरम्यान डॉक्टरांना मदत करणे आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा थांबणार नाही अशी व्यवस्था करण्याचे आवाहन केले.


श्रीनगरच्या रुग्णाने मृत्यूपूर्वी केले या शहरांचे दौरे, थांबला सुद्धा...


जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कंसल यांनी सांगितले, कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले 4 जण सुद्धा संक्रमित झाले आहेत. कोरोनामुळे बळी गेलेल्या व्यक्तीने 7 मार्च ते 21 मार्च दरम्यान दिल्ली आणि सहारनपूरचा प्रवास केला होता. तत्पूर्वी 7 ते 9 मार्च पर्यंत निझामुद्दीन मशीदीत थांबला होता. यानंतर 9 मार्च रोजी ट्रेनने देवबंद आणि 11 मार्च पर्यंत दारुल उलूममध्ये थांबला. 11 मार्चला ट्रेनने तो जम्मूच्या दिशेने निघाला. या ठिकाणी 12 ते 16 मार्च पर्यंत मशीदीत थांबला. 16 मार्चला इंडिगो फ्लाइटने जम्मू ते श्रीनगरला पोहोचला. मग 18 मार्च पर्यंत सोपोरमध्ये थांबल्यानंतर 21 मार्चला हैदरपुरा येथे परतला. आरोग्य बिघडल्याने 22 मार्च रोजी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्याचा मृत्यू झाला आहे.


मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी केवळ एकाचे वय 50 वर्षांपेक्षा कमी


पश्चिम बंगालमध्ये सोमवारी 57 वर्षीय व्यक्तीचे आणि हिमाचल प्रदेशात अमेरिकेतून परतणाऱ्या एकाचे निधन झाले होते. तत्पूर्वी रविवारी मुंबईत एका 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. याच दिवशी पाटण्यात 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. तो डायबेटिक अर्थात मधुमेही होता. त्याची किडनी सुद्धा खराब होती. 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या रुग्णाचा बळी गेल्याची ही पहिलीच वेळ आहे. पाटण्यातील रुग्ण नुकताच कतार या देशातून परतला होता. महाराष्ट्रात मंगळवारी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचे वय 63 वर्षे होते. डॉक्टरांनी या रुग्णाला आधीच उच्च रक्तदाब आणि मधुमेह असल्याचे म्हटले होते. आतापर्यंत ज्या कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. त्यातील बहुसंख्य मधुमेही किंवा इतर आजाराने सुद्धा ग्रस्त होते.














N